नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड रॉबिन स्टेज अंतर्गत सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी जेतेपदने हुलकावणी दिली आहे. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ काहीतरी चमत्कार करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाला भारतात जाण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले. बोर्डाच्या प्रवक्त्याने याबाबत खुलासा केला होता. ते म्हणाले की, ‘संघाच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारची आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील नियोजित विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही सरकारशी संपर्क सुरू केला आहे. त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाल्यानंतरच आम्ही आयसीसीला याबाबत माहिती देऊ,’ असेही पीसीबीने म्हटले आहे.
या आगळीकीनंतर आता आयसीसीने पीसीबीला सज्जड दम भरला आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बार्कले यांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, ‘पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला आहे. आम्हाला आशा आहे की, ते हा करार मोडणार नाहीत आणि भारतात येतील. विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ आपापल्या देशाच्या नियमांना बांधील आहेत आणि आम्ही त्याचाही आदर करतो. मात्र, विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येईल, असा आम्हाला विश्वास आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीसीबी निर्णय घेऊ शकते
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने पीसीबीला विश्वचषक स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली नसल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. पाकिस्तान सरकारने सुरक्षा व्यवस्थेची चौकशी सुरू केली आहे. वृत्तानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तान सरकार वनडे विश्वचषक खेळण्यासाठी त्यांचा संघ भारतात जाणार की नाही याबाबत निर्णय घेईल.
पाकिस्तानला मोठा झटका
दरम्यान, विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, पीसीबीने नखरे करत आपल्या काही सामन्यांची ठिकाणे बदलण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही मागणी फेटाळून लावत त्यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपाड झाला आहे.
पीसीबीला ठिकाण का बदलायचे होते?
चेपॉकच्या मैदानावर फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी आहे. अशातच अफगाणिस्तानमध्ये रशीद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्यासह लक्षवेधी फिरकी गोलंदाज आहेत जे पाकिस्तानसाठी मोठा धोका असू शकतात. तर, बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदान फलंदाजांसाठी चांगले आहे तिथे धावसंख्येचा पाठलाग सहज करता येतो. दोन्हीपैकी एकाही सामन्यात ते फेव्हरिट नसतील, अशी भीती पाकिस्तानला आहे. याच कारणास्तव त्यांनी स्थळ बदलण्याची मागणी केली.
ठिकाणांची आदलाबदली करण्यासाठी आग्रह
मनोरंजक गोष्ट म्हणजे पाकने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदली करण्याचा आग्रह केला. म्हणजे ऑस्ट्रेलियाशी चेपॉक येथे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चिन्नास्वामी मैदानावर खेळला जावा असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आयसीसी आणि बीसीसीआयने पीसीबीची मागणी फेटाळून लावत त्यांनी आपले सामने नेमून दिलेल्या ठिकाणीच खेळवायचे आहेत, असा इशारा दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta