नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता.
नीरज चोप्रानं यंदाच्या मोसमात उत्तम पुनरागमन केलं आहे. नीरज 5 मे रोजी दोहा डायमंड लीगनंतर इतर कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एफबीके गेम्स आणि पावो नूरमी गेम्स या दोन्ही स्पर्धांमधून नीरजनं दुखापतीमुळे माघार घेतली होती.
नीरज चोप्रानं या लीगच्या पाचव्या फेरीत 87.66 मीटर फेक करून हे विजेतेपद पटकावलं. दरम्यान, त्यानं या फेरीत फाऊलनं सुरुवात केली आणि नंतर 83.52 मीटर, त्यानंतर 85.04 मीटर भाला फेक केली. त्यानंतर चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला, पण त्याच्या पुढच्याच फेरीत नीरजनं 87.66 मीटरवर भाला फेकला. नीरजचा शेवटचा थ्रो 84.15 मीटर होता, पण पाचव्या फेरीत नीरजची बरोबरी कोणताही खेळाडू करू शकला नाही. त्यामुळेच नीरजनं डायमंड लीगचा खिताब पटकावला.
Belgaum Varta Belgaum Varta