कोलंबो : इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळणार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममुळे विजयाचा दावेदार मानला जात आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तानने श्रीलंका संघाविरोधात विजय मिळवत फायनलचे तिकिट मिळवले. बुधवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारत आशिया चषकावर नाव कोरतेय, हे पाहणं औत्सुक्याचे आहे. या सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरार
इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने निर्वादित वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत भारताला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. बांगलादेशचा पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. साई सुदर्शन, यश धुल आणि अभिषेक शर्मा यांनी फलंदाजी मोठे योगदान दिलेय. हर्षित राणा आणि राजवर्धन हंगरकेकर, निशांत सिंधू आणि मानव सुतार यांनी भेदक मारा केला. युएई आणि नेपाळ दोन्ही संघांना भारतीय गोलंदाजांनी ऑलआऊट केले होते. पाकिस्तान विरोधातही साखळी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. आता फायनलमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
पाकिस्ताननेही या स्पर्धेत दमदार कामगिरी करत फायनलचे तिकिट मिळावलेय. मोहम्मद वासिम आणि शहनवाज धानी यांनी मोठे योगदान दिलेय. कासिम अक्रम या 20 वर्षीय खेळाडूनेही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. कासिम अक्रम याच्या गोलंदाजीचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल. त्याशिवाय एस फरहान आणि कामरान गुलाम यांनीही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. या स्पर्धेत पाकिस्तान संघाला फक्त भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला, हा अपवाद वगळता पाकिस्तानने प्रत्येक सामन्यात विजय मिळवलाय.
कुठे आणि कधी होणार सामना ?
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील इमर्जिंग एशिया कपमधील फायनल सामना श्रीलंका येथील कोलंबोच्या मैदानात होणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.