Friday , November 22 2024
Breaking News

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय, मालिकेत 2-2 बरोबरी

Spread the love

 

यशस्वी आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने विंडिजचा नऊ विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 179 धावांचे आव्हान भारताने 18 चेंडू आणि 9 विकेट राखून सहज पार केले. यशस्वी जयस्वाल याने नाबाद 84 तर शुभमन गिल याने 77 धावांची खेळी केली. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. रविवारी निर्णायक आणि अखेरचा सामना होईल.

यशस्वीकडून विंडिजचा समाचार

पदार्पणाच्या सामन्यात स्वस्तात परतणाऱ्या यशस्वी जायस्वाल याने आजच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. यशस्वीने पहिल्या चेंडूपासूनच विडिंजच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. यशस्वीपुढे विडिंजचे गोलंदाजी दुबळे जाणवत होते. यशस्वीने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी करत विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. कसोटीमध्ये छाप सोडणाऱ्या यशस्वीने टी20 मध्येही आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केले. यशस्वी जायस्वाल याने नाबाद 84 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 खणखणीत चौकार लगावले तर तीन षटाकरही ठोकले.

शुभमन गिलची दमदार फलंदाजी

तीन सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर अखेर शुभमन गिल फॉर्मात परतलाय. गिल याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक सुरुवात केली. गिल याने वेस्ट इंडिजची गोलंदाजी फोडून काढली. गिल याने 47 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत गिल याने 5 गगनचुंबी षटकार आणि तीन खणखणीत चौकार मारले. शुभमन गिल याने यशस्वी जायस्वाल याच्या साथीने भारताची धावसंख्या वाढवली. 77 धावांवर असताना रोमर्ड शेफर्ड याने गिल याला तंबूत धाडले.

गिल-यशस्वीची जोडीने धुतले

शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. गिल आणि यशस्वी या जोडीने विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. या युवा जोडीपुढे विंडिजचे गोलंदाज कमकुवत जाणवत होते. गिल-यशस्वी या जोडीने विक्रमी दीडशतकी भागिदारी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अखेरच्या काही षटकात गिल बाद झाला पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 94 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने 47 चेंडूत 79 धावांचे योगदान दिले तर शुभमन गिल याने 47 चेंडूत 77 धावा जोडल्या. गिल आणि यशस्वीने पहिल्या सहा षटकात 66 धावा केल्या होत्या. या जोडीने दहा षटकात शतकी भागिदारी केली. यशस्वी आणि गिल या जोडीने भारतासाठी टी20 मधील सर्वोच्च भागिदारीची नोंद केली. याआधी हा विक्रम रोहित आणि राहुल यांच्या नावावर होता.

हेटमायरचे वादळी अर्धशतक, अर्शदीपच्या तीन विकेट

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या षटकांपासून आपले इरादे स्पष्ट केले. पण अर्शदीपने विंडिजच्या इराद्यावर पाणी फेरले. अर्शदीपने दोन्ही सलामी फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. काइल मायर्स 7 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तर ब्रेंडन किंग 16 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांचा अडथळा दूर केला. दोघांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. पॉवेल आणि पूरन यांना प्रत्येकी एक एक धाव काढता आली. विंडिजचा डाव ढेपाळणार असेच वाटत होते. पण शाय होप आणि शिमरोन हेटमायर यांनी विंडिजचा डाव सावरला.

4 बाद 57 अशी कठीण परिस्थिती विंडिजची झाली होती. त्यावेळी अनुभवी शाय होप आणि हेटमायर यांनी विडिंजची धावसंख्या वाढवली. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 36 चेंडूत 49 धावांची भागिदारी केली. ही जोडी धोकादायक होईल असे वाटत असतानाच चहल याने शाय होप याला तंबूत पाठवले. शाय होप याने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. शाय होप बाद झाल्यानंतर रोमार्ड शेफर्ड आणि जेसन होल्डरही लागोपाठ तंबूत परतले. शेफर्ड याने 6 चेंडूत एका षटकारासह 9 धावांची खेळी केली. त्याला अक्षर पटेल याने तंबूत धाडले. तर जेसन होल्डर याला मुकेश कुमार याने क्लिन बोल्ड केले. होल्डर याला फक्त तीन धावा करता आल्या. शिमरोन हेटमायर याने एकाकी झुंज देत विंडिजची धावसंख्या 170 पार पोहचवली.

शिमरोन हेटमायर याने 61 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने 38 चेंडूत 4 खणखणीत षटकार ठोकले. त्याशिवाय तीन चौकारही मारले. हेटमायर याने ओडियन स्मिथ याच्यासोबत 23 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली. यामध्ये हेटमायर याने 14 चेंडूत 32 धावा चोपल्या. विंडिजकडून हेटमायर याने सर्वाधिक धावांची खेळी केली. अकिल हुसेन आणि ओडियन स्मिथ यांनी अखेरच्या षटकात धावांची लयलूट केली. स्मिथ याने 15 धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक विकेट घेतल्या. अर्शदीप याने विंडिजच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीप यादव याने दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *