Friday , November 22 2024
Breaking News

भारताने मालिका 3-2 ने गमावली, निर्णायक सामन्यात विंडिजने आठ विकेटने मारली बाजी

Spread the love

 

पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताने दिलेले 166 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने आठ गडी आणि बारा चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 3-2 ने बाजी मारली. वेस्ट इंडिजकडून ब्रैंडन किंग याने नाबाद 85 धावांची खेळी केली. तर निकोलस पूरन याने झटपट 47 धावांचे योगदान दिले.

भारताने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 12 धावांवर काईल मायर्सच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पूरन याने अखेरच्या दोन डावातील अपयश विसरून सकारात्मक फलंदाजी केली.

पूरनेने अर्शदीप सिंहच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकला, त्यानंतर हार्दिक पंड्याच्या षटकात सलग दोन षटकार मारून धावसंख्या वेगाने वाढवली. पूरन आणि किंग यांनी मिळून संघाची धावसंख्या पहिल्या 6 षटकात 1 गडी गमावून 61 पर्यंत नेली. पूरन आणि किंग यांनी विंडिजची धावसंख्या वेगाने वाढवली. दोघांपुढे भारताची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. पावसामुळे सामन्यात सातत्याने व्यत्यय येत होता. खराब हवामानामुळे 12.3 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला तेव्हा विंडीज संघाची धावसंख्या 1 गडी गमावून 117 धावा होती. यानंतर, खेळ सुरू होताच, विंडीज संघाला पूरनच्या रूपाने धक्का बसला. पूरन 47 धावांवर तिळक वर्माचा बळी ठरला.

निकोलस पूरन परतल्यानंतर ब्रँडन किंगला साथ देण्यासाठी मैदानात आलेल्या शाई होपने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. ब्रँडन किंगनेही दुसऱ्या बाजूने धावा काढल्या. किंगच्या फटकेबाजीच्या बळावर विंडिजने 18 व्या षटकांत सामना जिंकला. ब्रँडन किंगने 85 धावांची नाबाद खेळी केली तर होपनेही 22 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.

सूर्या एकटाच लढला

अखेरच्या टी 20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार यादव याने 61 धावांची खेळी केली. विडिंजकडून रोमारियो शेफर्ड याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण विंडिजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरवला. भारताचे दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांना मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल या जोडीला अकिल हुसेन याने तंबूत पाठवले. यशस्वी जायस्वाल पाच तर गिल नऊ धावांवर बाद झाला. 17 धावांत भारताचे दोन्ही सलामी फलंदाज बाद झाले होते. दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

सूर्या आणि तिलक यांनी भारताची धावसंख्या झटपट वाढवण्यावर भरत दिला. पण तिलक वर्मा याला 27 धावांवर बाद करण्यात विंडिजला यश आले. तिलक वर्माने 18 चेंडूत 2 षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. तिलक बाद झाल्यानंतर संजूलाही कमाल करता आली नाही. संजू सॅमसन 13 धावा काढून बाद झाला. त्या शेफर्ड याने बाद केले. हार्दिक पांड्याही आल्या वाटे परत गेला. हार्दिक पांड्याला 14 धावांवर शेफर्ड याने तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्या याने दमदार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने 61 धावांची झंझावती खेळी केली. पण मोक्याच्या क्षणी त्याने विकेट फेकली. सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या काही षटकात धावांची गरज असताना विकेट फेकली. सूर्यकुमार यादव याने 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.

भारतीय संघाने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. तिलक वर्मा आणि सूर्या यांच्यामधील भागिदारी वगळता एकाही जोडीला मोठी भागिदारी करता आली नाही. तळाची फलंदाजी तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढेपाळली. कुलदीप यादव, अर्शदीप सिंह यांना झटपट बाद करण्यात विंडिजला यश आले. अर्शदीप सिंह याने चार चेंडूत आठ धावा केल्या. कुलदीपला खातेही उघडता आले नाही. अक्षर पटेल याने अखेरच्या षटकात धावगती वाढवत भारताला सन्माजनक धावसंख्यापर्यंत पोहचवले. अक्षर पटेल याने 13 धावांचे योगदान दिले. सामन्यात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला होता.

विडिंजकडून रोमारियो शेफर्ड याने भेदक मारा केला. त्याने भाराताची मधली फळी तंबूत पाठवली. त्याने चार षटकात 31 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. अकील हुसेन यानेही अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन जणांना तंबूत पाठवले. जेसन होल्डर यानेही दोन विकेट घेतल्या. रोस्टन चेस याला एक विकेट मिळाली. अल्जारी जोसेफ, काइल मायर्स यांना एकही विकेट मिळाली नाही.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *