हरारे : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचं वयाच्या 49 व्या वर्षी कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी आली अन् संपूर्ण क्रिडाविश्वावर शोककळा पसरली. परंतु, आता स्ट्रीकचं निधन झालं नसून तो हयात असल्याचा दावा स्ट्रीकचा सहकारी आणि एका माजी क्रिकेटरनं केला आहे. माजी क्रिकेटर हेन्री ओलांगा यानं स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला असून त्याच्या निधनाचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच, ओलांगनं कॅप्शनमध्ये स्ट्रीकला स्वतः मेसेज करुन याची पुष्टी केल्याचंही म्हटलं आहे.
हेन्री ओलांगा यांनी सर्वात आधी ट्वीट करून हीथ स्ट्रीकचं निधन झाल्याचं म्हटलं होतं. तसेच, स्ट्रीकला श्रद्धांजलीही अर्पण केली होती. स्ट्रीक आता दुसऱ्या जगात गेल्याचं ओलांगनं म्हटलं होतं. झिम्बाब्वे क्रिकेटच्या महान क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्यासोबत खेळणं हा एक सन्मान आहे, असंही ओलांगनं आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पण त्यानंतर ओलांगनं ट्वीट डिलीट केलं आणि पुन्हा एक नवं ट्वीट केलं. या नव्या ट्वीटमध्ये ओलांगनं स्ट्रीक हयात असून त्याच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यानं ट्वीटमध्ये स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉर्टही शेअर केलाय.
ओलांगनं आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, मी पुष्टी करू शकतो की, हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी खूप लवकर पसरली. मी आताच त्याच्याशी बोललो. थर्ड अंपायरनं त्याला परत बोलावलंय. तो हयात आहे.