नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटवर सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मोहालीतील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत भारताने वनडेमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर होता. आता वनडेमध्येही पहिला क्रमांक पटकावलाय. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकवण्याचा विक्रम आधी दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर होता. आता भारतानेही असा विक्रम केला आहे.
आयसीसीच्या क्रमवारीवर फक्त भारतीय संघच नव्हे तर खेळाडूंचाही वरचष्मा आहे. वनडे, कसोटी आणि टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. टी२० मधील आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. तर वनडेमधील अव्वल गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. कसोटी गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर कसोटीमध्ये रविंद्र जाडेजा नंबर एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर आर. अश्विन नंबर दोन अष्टपैलू खेळाडू आहे. वनडेमध्ये शुभमन गिल फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात उर्वरित सामन्यात १३० धावा केल्यास शुभमन गिल नंबर एकचा फलंदाज होईल. टी२० मध्ये हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कसोटी गोलंदाजीत रविंद्र जाडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याशिवाय आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये इतर भारतीय खेळाडूंची नावे आहेत.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी
पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे ११५ रेटिंग गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे टॉप-१० संघांमध्ये आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आयसीसी टी२० क्रमवारीत भारतीय संघ २६४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे
आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ आणि खेळाडूंची कामगिरी
कसोटी संघ नंबर १ – भारत
एकदिवसीय संघ नंबर १ – भारत
टी २० संघ नंबर १ – भारत
टी २० नंबर १ फलंदाज – सूर्या
एकदिवसीय नंबर १ गोलंदाज – सिराज
कसोटी नंबर १ गोलंदाज – आर. अश्विन
कसोटी नंबर १ अष्टपैलू – जडेजा
कसोटी नंबर २ अष्टपैलू – आर. अश्विन
एकदिवसीय नंबर २ फलंदाज – शुभमन गिल
टी २० नंबर २ अष्टपैलू – हार्दिक पांड्या
कसोटी नंबर ३ गोलंदाज – जडेजा
Belgaum Varta Belgaum Varta