Sunday , December 7 2025
Breaking News

मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम

Spread the love

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढाईत सनरायझर्सने मुंबईला तीन धावांनी पराभूत केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला फक्त १९० धावा करता आल्या. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठी, प्रियाम गर्ग आणि गोलंदाजी विभागात उमरान मलिकने चांगला खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादने प्लेऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवले.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १९४ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईला कसरत करावी लागली. सलामीला आलेले रोहित शर्मा आणि इसान किशन या जोडीने चांगली खेळी केली. या जोडीने अनुक्रमे ४८ आणि ४३ धावा करत ९५ धावांची भागिदारी केली. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डॅनियल सॅम्स (१५), तिलक वर्मा (८) यांनी निराशा केली.
चौथ्या विकेटसाठी आलेल्या टीम डेविडने धडाकेबाज खेळी केली. त्याने चौकार, षटकार यांचा पाऊस पाडला. अवघ्या १८ चेंडूंमध्ये त्याने चार षटकार आणि तीन चौकार लगावत ४६ धावा केल्या. मात्र टी नटराजनच्या चेंडूवर तो धावबाद झाला. टीम डेविड बाद झाल्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. डेविडनंतर ट्रिस्टन स्टब्स (२) आणि संजय यादव (२) लवकर बाद झाले. त्यानंतर शेवटी रमणदीप सिंग आणि जसप्रित बुमराह यांनी शेवटपर्यंत लढा दिला. मात्र त्यांना अपयश आले. शेवटी वीस षटके संपेपर्यंत मुंबईला १९० धावा करता आल्या. परिणामी हैदराबाद संघाचा तीन धावांनी विजय झाला.
याआधी नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुबईसाठी योग्य ठरला. मात्र पुढे प्रियाम गर्ग (४२) आणि राहुल त्रिपाठी या जोडीने धडाकेबाज खेळी केली. राहुल त्रिपाठीने ४४ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि ९ चौकार लगावत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या निकोलस पुरन यानेदेखील ३८ धावा केल्या. त्रिघांच्या या धडाकेबाज खेळीमुळे हैदराबाद संघाने १९३ धावा केल्या. अभिषेक शर्मा अवघ्या ९ धावांवर झेलबाद झाला. तर ऐडन मर्करामनेही निराशा केली. त्याने फक्त दोनच धावा केल्या.
हैदराबादने गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करुन दाखवली. उमरान मलिकने नेहमीप्रमाणे जोरदार मारा करत मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीदेखील प्रत्येक एक बळी घेतला. तसेच टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येक एका गड्याला धावबाद केल्यामुळे मुंबईचा संघ खिळखिळा झाला.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *