गयाना : भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अक्षर पटेलला “मॅन ऑफ द मॅच” जाहीर केले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताला पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने तिसऱ्या षटकात १९ धावांवर बसला. रीस टोपलीने कोहलीला क्लीन बोल्ड केले. कर्णधार रोहित शर्माला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात उतरला पण पंतही ज्यादा वेळ मैदानात राहू शकला नाही. सॅम कुरनने बेअरस्टोच्या हाती पंतला झेलबाद केले. पावसामुळे थोडा वेळ खेळ थांबला तोपर्यंत भारताने दोन गडी गमावून ६५ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत त्याने संघाला सावरले. त्याला सूर्यकुमार यादवने मोलाची साथ दिली. मात्र रोहित शर्मा ५७ धावांवर असताना बाद झाला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद झाला. अवघ्या ३ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले त्याने ४७ धावा केल्या.
भारताला १३ व्या षटकात ११३ धावांवर तिसरा धक्का बसला. आदिलने रोहित शर्माला तंबूत धाडले. तो ५७ धावा करून बाद झाला. चौथा धक्का १६व्या षटकात १२४ धावांवर बसला. त्यानंतर हार्दिक पांड्याने डाव सावरला होता. सलग दोन षटकार ठोकले मात्र तिसरा षटकार मारताना तो झेलबाद झाला. त्याने २३ धावाचे योगदान दिले. जडेजाने १७ तर अक्षर पटेलने १० धावा केल्या.