भारतानं टी-20 विश्वचषक जिंकला आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. भारत विश्वविजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला आहे. अंतिम सामन्याने कोहलीने विराट खेळी केली, ज्याची सर्वांनाच अपेक्षा होती. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराटला चांगली खेळी करता आली नव्हती, पण अखेरच्या सामन्यात विराटने नावाला साजेशी अशी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने 76 धावांची शानदार खेळी केली. यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
‘हा माझा अखेरचा टी-20 वर्ल्ड कप’
सामनावीर पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली म्हणाला, ”हा माझा अखेरचा टी-20 विश्वचषक होता. टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झाले आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला धावा काढताना झगडता. तुम्ही धावा घेऊ शकत नसल्याचं जाणवतं. मग गोष्टी घडतात, बदलतात. देव महान आहे, ज्या दिवशी संघाला सर्वात जास्त गरज असते. त्यादिवशी संघासाठी माझ्या बॅटमधून धावा निघाल्या. हा माझा अखेरचा टी-20 सामना आहे. अखेरच्या सामन्यात मला जास्त फायदा घ्यायचा होता. विश्वचषक उंचवायचा होता. आता पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि भारताचा झेंडा फडकवत ठेवतील.”, असे विराट कोहली म्हणाला.