चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. तर आर अश्विन नाबाद 102 आणि रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळत आहेत. 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती असताना कोणलाही वाटलं नाही की 200 पार धावसंख्या होतील. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सावधतेने खेळत सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. तसेच भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाला शतकासाठी अवघ्या 14 धावांची आवश्यकता असून पहिल्या सत्रात तो कामगिरी चोख बजावेल अशी आशा आहे. दुसरीकडे, भारताने पहिल्या दिवशीचा खेळ बांगलादेशच्या पारड्यातून खेचून आणला आहे.
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. तर त्यानंतर आलेला शुबमन गिल तर खातही खोलू शकला नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाही. अवघ्या 6 धावा करून बाद झाला. हसन महमूद पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर भारी पडला. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने 60 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत 39 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल काही करतील अशी आशा होती. पण यशस्वीने 118 चेंडूत 56 धावा केल्या आणि तंबूत परतला. तो बाद होत नाही तोच केएल राहुलची खेळी 16 धावांवर संपुष्टात आली.
बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने आघाडीचे महत्त्वाचे विकेट घेतल्या. नहीद राणा आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. पण त्यांना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी काय फोडता आली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta