नवी दिल्ली : भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८ वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.
आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२ वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले.
डी गुकेश या ऐतिहासिक विजयानंतर म्हणाला, “सामन्यात जेव्हा मला कळलं की लिरेनने घोडचूक केली आहे, तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या सर्वांनाच माहितीय की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे. तो बुद्धिबळच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. त्याने या सामन्यादरम्यान किती दबाव झेलला आणि शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिलं की खरा चॅम्पियन कसा असतो. माझ्यासाठी तो खरा विश्वविजेता आहे. मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचं प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं आणि आज मी माझं स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार.”