दुबई : भारतने आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे तिकीट जवळजवळ निश्चित केले आहे. न्यूझीलंडपाठोपाठ भारताकडूनही झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. यासह टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली. टीम इंडिया त्यांच्या गटात एक नंबरला गेली आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 241 धावांत गुंडाळून निम्मी लढाई जिंकली होती. मग विराट कोहलीनं वन डे कारकीर्दीतली आणखी एक सर्वोत्तम खेळी उभारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 111 चेंडूत 100 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 चौकार मारले. विराटने श्रेयस अय्यरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी त्याने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने आणि शुभमन गिलने धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हार्दिक पांड्याने मोडली. त्याने बाबरला तंबुत पाठवले. त्याला 26 चेंडूत पाच चौकारांसह फक्त 23 धावा करता आल्या. पुढच्याच षटकात इमाम उल हकही धावबाद झाला. त्याला 26 चेंडूत फक्त 10 धावा करता आल्या.
47 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर सौद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तान डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. दरम्यान, शकीलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी अक्षर पटेलने मोडली. त्याने रिझवानला क्लीन बोल्ड केले. 77 चेंडूत तीन चौकारांसह 46 धावा काढल्यानंतर तो बाद झाला.
रिझवान आऊट होताच पुन्हा एकदा विकेटची झुंबड उडाली. 76 चेंडूत 5 चौकारांसह 62 धावा काढल्यानंतर शकीलही हार्दिक पांड्याचा बळी ठरला. तैय्यब ताहिर चार धावा काढून बाद झाला आणि सलमान अली आगा 19 धावा काढून बाद झाला. सलमानला कुलदीपने आणि तैय्यबाला जडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शाहीन आफ्रिदीला खातेही उघडता आले नाही. नसीम शाह 14 धावा काढून बाद झाला आणि हरिस रौफ आठ धावा काढून बाद झाला. कुलदीप आणि हार्दिक व्यतिरिक्त हर्षित राणा, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta