बर्मिंगहॅम : आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय कसोटी संघाने इंग्लंडच्या भूमीत शुबमन गिल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. भारताने इंग्लंडचा दुसर्या कसोटी सामन्यात 336 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र गोलंदाजांनी इंग्लंडला 68.1 षटकामध्ये 271 धावावर गुंडाळले. भारताने यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बर्मिंगहॅममध्ये पहिलावहिला विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारताने यासह लीड्समधील पहिल्या पराभवाची परतफेड केली.
इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. शुबमनने 269 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 87 तर रवींद्र जडेजा याने 89 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 42 आणि करुण नायर याने 31 धावा जोडल्या. भारताने यासह 151 षटकांमध्ये सर्वबाद 587 धावा केल्या.
त्यानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या दोघांनीच इंग्लंडचा बाजार उठवला. सिराजने 6 आणि आकाशने 4 गडी बाद करत इंग्लंडला 89.3 षटकामध्ये 407 धावावर सर्व गडी बाद केले. त्यामुळे भारताला 180 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर शुबमनने दुसऱ्या डावातही धमाका केला. शुबमनने 161 धावा केल्या. तर केएल राहुल 55, ऋषभ पंत 65 आणि रवींद्र जडेजा याने नाबाद 69 धावा केल्या. भारताने यासह दुसरा डाव हा 83 षटकांत 6 बाद 427 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या दिवशी 608 धावांचे आव्हान मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta