दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास
मुंबई : जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहरांवर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला.
सामन्यात एक क्षण असा आला होता, जिथे हम्पीकडे पुन्हा सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, ती त्या संधीचं रूपांतर विजयात करू शकली नाही. दुसरीकडे, दिव्याने कोणताही चुक न करता ऐतिहासिक कामगिरी केली आणि महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला.
विजयानंतर भावुक झाली दिव्या देशमुख
नागपूरची 19 वर्षांची दिव्या देशमुख आता केवळ वर्ल्ड कप विजेतीच नाही, तर तिने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे. या क्षणी दिव्या खूपच भावूक झाली होती. तिच्यासाठी हे आयुष्यातलं अविस्मरणीय क्षण ठरले. विशेष म्हणजे, दिव्या आधीच ‘कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरली आहे, जे बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या वाटचालीतले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Belgaum Varta Belgaum Varta