
मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. शफाली वर्माच्यासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करत अंतिम सामन्यात बाजी मारली. २००५ आणि २०१७ मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने स्वप्ननगरीत साकार करून दाखवले. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचे टेन्शन वाढवलं होते. पण दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला अन् अमनजोत कौरने तिसऱ्या प्रयत्नात कॅच पूर्ण करत तिसऱ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह २५ वर्षानंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार हे आधीच ठरलं होतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीचे स्वप्न साकार केले.
भारतीय महिला संघाने टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २९८ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका २४६ धावांवर आटोपला, आणि भारताने हा सामना ५२ धावांनी जिंकला.
Belgaum Varta Belgaum Varta