Tuesday , March 3 2026
Breaking News

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

Spread the love

 

कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्ध विजयी होण्याची मालिका यशस्वीरित्या कायम राखली आहे. भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने या विजयासह वर्ल्ड कप मोहिमेतील आपला सलग तिसरा विजय मिळवला. तसेच भारताने यासह सुपर 8 फेरीत धडक दिली आहे.

टीम इंडियाचा आठवा विजय
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपला विक्रम आणखी मजबूत केला. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी मात करुन एकूण आठवा विजय मिळवला.

सामन्याचा धावता आढावा
पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. ओपनर अभिषेक शर्मा आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या दोघेही भोपळा फोडण्यात अपयशी ठरले. मात्र इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या 5 फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तिलकने 25 आणि सूर्याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवमने 27 धावा जोडल्या. तर रिंकुने नाबाद 11 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावासंख्या उभारली.

पाकिस्तानसाठी सॅम अय्यूब सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सॅमने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सलमान आघा, उस्मान तारीक आणि शाहिन आफ्रिदी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पाकिस्तानला विजयी हॅट्रिकपासून रोखलं
पाकिस्तानच्या उस्मान खान याचा अपवाद वगळता इतर एकाही प्रमुख फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. उस्मान खान याने 44 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी शाहिन अफ्रिदी याने नाबाद 23 धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. शादाब खान याने 14 आणि फहीम अश्रफने 10 धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त इतर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून मोहिम फत्ते केली.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी मैदान गाजवले, ऑस्ट्रेलियाला नमवत भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

Spread the love  ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा मुंबई : जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *