बंगळूर : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मांजा दोऱ्या’बाबत कर्नाटक सरकारने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राणीप्रेमींच्या सूचना लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने मानव, पक्षी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी धातू किंवा काचेच्या लेप असलेल्या तारा किंवा मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आला आहे.
पूर्वी नायलॉन (चायनीज) मांजापुरती मर्यादित असलेली ही बंदी सरकारने एका अधिसूचनेद्वारे काच किंवा धातूच्या पावडर लेपित धाग्यांवरही वाढवली आहे. यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा (ईपीए), १९८६ च्या कलम ५ अंतर्गत सरकारने आपल्या अधिसूचनेत सुधारणा केली आहे आणि एक आदेश जारी केला आहे. यानुसार कोणत्याही धारदार, धातूचा किंवा काचेच्या पावडरने, चिकटवलेल्या वस्तू किंवा इतर कोणत्याही सामग्रीने म्हणजे ‘थ्रेड स्ट्राँगिंग मटेरियल’ने लेपित केलेल्या मांजा दोऱ्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. केवळ फायबरग्लास किंवा धातूचे घटक नसलेल्या दोऱ्यांद्वारे पतंग उडवण्याची परवानगी आहे.
पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स (पेटा) इंडियाने काचेच्या पावडरसह लेपित मांजादोऱ्यावरील बंदीचे स्वागत केले आहे. पेटा इंडियाचे वरिष्ठ अधिवक्ता फरहत उल ऐन म्हणाले, ‘नायलॉन मांजासह काच आणि धातू-प्रबलित पतंगाच्या दोऱ्यांमुळे उद्भवलेल्या धोक्यांकडे लक्ष दिल्याबद्दल आम्ही कर्नाटक सरकारचे कौतुक करतो. या निर्णायक कृतीमुळे अगणित मानवी आणि प्राण्यांचे जीव वाचतील.
मांजा दोर्यावर फक्त ऑफिसयली बंदि नको तर प्रत्यक्षात याचे पालन होतय का नाहि ते प्रशाशनाने निक्शून पहाव.