बेंगळुरू : राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करून कसलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हायस्कुलचे वर्ग उद्यापासून भरविण्यात येणार आहेत. गोंधळ होऊ शकेल अशा शाळांबाबत शांतता सभा घेऊन अनुचित प्रकार टाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कॉलेज सुरु करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांकडून अहवाल मागवून निर्णय घेण्यात येईल. पूर्ववत सौहार्दपूर्ण वातावरणात शाळा-कॉलेज सुरु करू. त्यालाच आमचे प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांनीही अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. हिजाब प्रकरणी भडकावू शक्तींवर, हा वाद निर्माण करणाऱ्यांवर सरकारचे लक्ष आहे. याबाबत कोण चिथावणी देतात, सोशल मीडियावर पोस्ट टाकतात त्यांच्यावर आमचे पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर कठोर कारवाईही करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यानी दिला. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत बोलताना बोम्मई म्हणाले, आर्थिक कल्याण, लोककल्याणाच्या दृष्टीने आर्थिक शिस्तीसह अर्थसंकल्प मांडण्यात येईल. कोविडमुळे गेल्या २ वर्षांत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अलीकडच्या दिवसांत थोडीफार सुधारणा दिसून येत आहे. महसूल वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या कल्याणावर भर देण्यात येईल. तळागाळातील आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. अनुदान मंजुरीत भेदभाव झाल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सर्व परिवहन मंडळांना योग्य अनुदान देण्यात आले आहे. कुठेही भेदभाव झालेला नाही. सर्व परिवहन मंडळांच्या विकासासाठी श्रीनिवास मूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन व्हावे, बचत व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. या समितीने सर्व परिवहन मंडळांशी सभा घेऊन चर्चाही केली आहे. वीज पुरवठा कंपन्यांच्या कारभारातही सुधारणा करण्यासाठीही समिती नेमली आहे असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. एकंदर, सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आता कोणत्या खात्याला केवढे प्राधान्य दिले जाणार हे पहावे लागेल.
Check Also
केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर : मंत्री एच. के. पाटील
Spread the love बेळगाव : राज्यात सर्वत्र काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित …