बेंगळुरू : शिमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बंगळुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, शिमोगा व परिसरातील जनतेला मी आवाहन करतो की, या प्रकरणी न्यायोचित मार्गाने तपास करून आरोपीना अटक करण्यात येईल. त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे कोणीही संतापून न जाता शांतता व संयम राखावा. या हत्येवरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या हत्येवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, सिद्दरामय्या नेहमीच तर्कहीन बोलतात. हर्षची हत्या मुस्लिम गुंडांनी केल्याचे मंत्री ईश्वरप्पा यांनी म्हटल्याचे निदर्शनास आणून देताच बोम्मई म्हणाले, ईश्वरप्पा तसे बोलले म्हणून मीसुद्धा तसेच बोलले पाहिजे असे नाही, पण तपासात सत्य बाहेर येईलच हे मात्र निश्चितपणे सांगतो.
