Wednesday , April 8 2026
Breaking News

भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा धक्का

Spread the love

 

राज्यभर एकाच वेळी आठ ठिकाणी छापे, कोट्यवधींची मालमत्ता उघड

बंगळूर : भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात कर्नाटक लोकायुक्तांनी मंगळवारी मोठी कारवाई करत राज्यातील किमान आठ सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले.
लोकायुक्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोडगू, बिदर, बळ्ळारी, चित्रदुर्ग आणि म्हैसूर यांसह विविध जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
कोडगू जिल्ह्यातील हरंगी धरण उपविभागात कार्यरत सहाय्यक कार्यकारी अभियंता आय. के. पुट्टस्वामी यांच्या घर व कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
चित्रदुर्ग येथील निर्मिती केंद्रातील सहाय्यक लेखापाल सुशीलम्मा यांच्या मेदेहळ्ळी रोडवरील घरावर आणि हिरियूरजवळील त्यांच्या शेतघरावरही लोकायुक्तांनी छापे टाकले. लोकायुक्त एसपी वासुदेव राम आणि डीवायएसपी मृत्युंजय यांच्या नेतृत्वाखाली कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
बळ्ळारी येथे मत्स्य विभागाचे सहाय्यक संचालक शिवण्णा यांच्या घरासह चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे.
शिमोगा येथे मागासवर्गीय कल्याण विभागाच्या जिल्हा अधिकारी शोभा यांच्या घर व कार्यालयावरही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी उत्पन्न, मालमत्ता, बँक व्यवहार आणि खरेदी-विक्री संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, बेळगाव येथे शहर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता अजय सिंग राजपूत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आंजनेय नगर, अथणी आणि हुक्केरी येथे एकाच वेळी कारवाई करण्यात आली. छाप्यात सुमारे एक किलो सोन्याचे दागिने आणि बँकेत सुमारे दोन कोटी रुपयांची ठेव आढळून आली. तसेच त्यांच्या नावावर शहरात तीन घरे असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, मंड्या सार्वजनिक बांधकाम विभागातील एईई रेवण्णा यांच्याविरोधातही उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा आरोप असून त्यांच्या मैसूर कार्यालयासह मंड्यातील दोन घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

म्हैसूरमध्येही लोकायुक्तांची धाड
म्हैसूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून काम करणाऱ्या रेवण्णा यांच्या घर आणि कार्यालयाची लोकायुक्त पोलीस धाड टाकून झडती घेत आहेत.
आज सकाळी, म्हैसूर लोकायुक्त व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, म्हैसूर सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता रेवण्णा यांच्या म्हैसूर येथील कार्यालयावर आणि मंड्या येथील त्यांच्या घरावर छापा टाकला असून, दोन्ही ठिकाणी तपास करत आहे.
सध्या सर्व ठिकाणी लोकायुक्त अधिकारी कागदपत्रांची सखोल तपासणी करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध : मंत्री मधू बंगारप्पा

Spread the love  विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही बंगळूर : राज्य सरकार द्विभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *