हुबळी : माझा पक्ष हा देशभक्तीने भारलेला पक्ष आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष आहे, काँग्रेसची देशभक्ती ही तालिबान सारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे.
हुबळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे या सर्व गोष्टींपासून काँग्रेसने भारतीयांना वंचित ठेवले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीकोन ठेऊन नवे शैक्षणिक धोरण तयार केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हे सर्व बदल घडवून आणणे शक्य होते. परंतु काँग्रेसला या सर्व गोष्टींमध्ये अपयश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्रात एक धाडसी पाऊल टाकत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता सर्व विद्यार्थी 21व्या शतकातील ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परंतु या कार्यात देखील काँग्रेस विघ्न आणण्याचे काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी एक वक्तव्य केले, ते अत्यंत निराशादायक असल्याचेही मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आता जनता सावरू लागत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये सामान्य जनतेला वेठीला धरून पुन्हा नवे संकट उभे करू नये. आंदोलकांना आतापर्यंत अनेकवेळा आवाहन केले आहे. भारत बंद पुकारून सामान्य जनतेला त्रास होईल, याचे भान ठेवून वेगळ्या पद्धतीने आपले आंदोलन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले.
