बेळगाव : कालच्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही तीन जागा जिंकल्या आहेत. आता विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात व्यक्त केला.
शनिवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच तीन जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या चार जागा जिंकण्याचा विश्वास आहे. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येडियुरप्पा यांच्यासोबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र प्रचार केला आहे. सर्व संघ-संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. अरुण शहापूर, हनुमंत निरानी मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील याचा विश्वास आहे, असे बोम्मई म्हणाले.
केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांच्या भाजपविरोधातील नाराजीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोरे यांना डॉक्टरेट देण्याचा कार्यक्रम 6 महिन्यांपूर्वीच ठरल्याचे त्यांनी मला सांगितले होते. कुठे सूचना द्यायच्या आहेत तेथे कोरे यांनी त्या दिल्या आहेत. बेळगाव आणि हुबळीत मोठी सभा घेणार आहोत. प्रभाकर कोरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांचे आम्हाला सतत मार्गदर्शन असते. कोरे यांचे स्वतःचे असे स्थान आहे. त्यांनी 40 वर्षे अखंड सामाजिक जीवनात केलेले कार्य आम्हाला प्रेरक, मार्गदर्शक आहे. त्याचे महत्व जराही कमी झालेले नाही. ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. वस्तुस्थिती पाहाल तर भाजपला बेळगाव जिल्ह्यात खूप संधी आहेत. आमच्यात 100% एकी आहे. सगळ्या सावकारांनी निवडणुकीत रस घेऊन काम केले. आपापल्या मतदारसंघात त्यांनी सभा घेऊन पक्षाचा प्रचार केला आहे, असे बोम्मई म्हणाले.
भाजपची बी टीम कोण आहे हे माहित आहे या कुमारस्वामींच्या विधानावर आणि सिद्धरामय्या यांच्या मनात तुमच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे का या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सिद्धरामय्या माझ्या विरोधातही बोलतात. बेळगावात माझ्याविषयी त्यांनी कोणती भाषा वापरली तुम्हाला माहित आहे. त्यामुळे सॉफ्ट की हार्ड कॉर्नर हे तुम्हीच ठरवा असे प्रसारमाध्यमांना सांगितले.
सिद्धरामय्या असोत किंवा कुमारस्वामी, त्यांच्या व्यक्तव्याबाबत बोलायचे नाही असे मी ठरवले आहे. काँग्रेस जेडीएसला आमची बी टीम म्हणतो, जेडीएस काँग्रेसला आमची बी टीम म्हणतो. याचा अर्थच हा आहे की आम्हीच आमची बी टीम आहोत. भाजप ए टीम आहे हे सगळ्यांनी मान्य केले आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मुळावर उठले आहेत या कुमारस्वामींच्या आरोपावर, एका पक्षाला संपवायचे हे दुसर्या पक्षाच्या हाती नसते. सत्ता कुणी मिळवायची कुणी गमवायची हे जनतेच्या हातात आहे, असे बोम्मई म्हणाले.
