मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणार्या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दगा देणार्या आमदारांची नावं जाहीरपणे सांगितले.
राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता ते पाळले गेले असते तर शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव झाला नसता. विशेषत: वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंगे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीची सगळी मतं जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारातील सहा-सात मतं न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
काही घोड्यांवर जास्त बोली लागली
काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले हे घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात. पण विकले जाणारे लोकं कुणाचेच नसतात. साधारण 6 अपक्षांनी आम्हाला धोका दिला. ज्या अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही मत दिलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
’भाजपचा विजय दैदिप्यमान वगैरे नाही’
आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असे होत नाही. संजय पवार यांना पहिल्या फेरीत 33 मते मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत 27 मते मिळाली होती. हादेखील संजय पवारांचा विजयच आहे. पण शेवटी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की, त्यामुळे दुसर्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक विजयी ठरले. घोडेबाजारातील काही घोडे जास्त किंमतीला विकले गेल्याने संजय पवार यांचा पराभव झाला, असे राऊत यांनी सांगितले.
