बंगळूरू : लिंगायत पंचमसाली समुदायाला ’2अ’ प्रवर्गात समाविष्ट न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुडलसंगम पंचमसाली मठाचे जयमृत्यूंजय स्वामीजी यांनी दिला. आज त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन लिंगायत आरक्षणावर प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री बोम्माई यांनी आपण ही बाब गांभिर्याने घेतली असल्याचे सांगून यावर निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ देण्याचे स्वामीजीना आवाहन केले.
स्वामीजीनी आज सकाळी मंत्री सी. सी. पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची कृष्णा येथील कार्यालयात भेट घेतली आणि समाजाच्या मागणीवर त्यांच्याशी चर्चा केली.
पंचमसाली समाजाचा 2 अ मध्ये समावेश करण्यासाठी सरकारला दिलेली मुदत 15 सप्टेंबरला संपली आहे. तथापि, सरकारने या मागणीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याबद्दल जयमृत्यूंजय स्वामीजी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वामीजी म्हणाले, आज आमचे अभियान संपणार आहे. आता यावर तातडीने निर्णय घ्या. अन्यथा, पुन्हा उपोषण सुरू करावे लागेल असा इशारा स्वामीजीनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी मागितला वेळ
स्वामीजींच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी, पंचमसाली समाजाचा 2 अ वर्गात समावेश करण्यासंदर्भात मागासवर्ग कायम आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश हेगडे यांनी कांही वेळ मागितला आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर मंत्रिमंडळात यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी आणखी कांही वेळ देण्याची स्वामीजीना विनंती केली.
यावर स्वामीजीनी, या विषयावर समाजातील आमदार आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. स्वामीजी आज संध्याकाळी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
