बेळगाव : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून आज (दि.12) सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 75 हजारावरुन 1 लाख क्युसेक करण्यात आला आहे. गेली दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग 75 हजार क्युसेक करण्यात येत होता. या धरणाची क्षमता 123 टीएमसी असून सध्या या धरणात पाणीसाठा 87.99 टीएमसी आहे. हे धरण सध्या 71.53 टक्के भरले आहे. या धरणामध्ये आता 1 लाख 4 हजार 852 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
आज कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास तीन फुटांनी वाढली आहे. कृष्णा खोर्याच्या पूर्व पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून शून्य, वारणा धरणातून 885 क्युसेक, दूधगंगा धरणातून 900 क्युसेक, पंचगंगा नदी, कुंभी धरणातून 550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोर्यातील धरणांमधून एकूण विसर्ग 2 हजार 335 क्युसेक आहे. कोयना धरणातून 75 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतरच विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरणाच्या अधिकार्यांनी दिली असल्याची माहिती बेळगावच्या पाटबंधारे अधिकार्याकडून देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta