तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. जेथे कोरोनाची बाधा झाली आहे तेथे कंटेनमेंट झोन बनवून बाधितांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. बाधितांच्या, लक्षणे आढळलेल्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. काही प्रकरणात सॅम्पल्स जीनोम टेस्टला पाठवण्यात येत आहेत. बाधितांमधील विषाणू डेल्टा आहे का ओमिक्रॉन याचा शोध घेण्यात येत आहे असे बोम्माई म्हणाले.
राज्यातील विमानतळांवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे सांगून बोम्माई म्हणाले, विमानाने येणार्या प्रवाशांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवेश देण्याचा कठोर निर्णय सरकारने घेतला आहे.
