बेळगाव : कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनेतील बहुप्रतिष्ठीत अशी “गृहलक्ष्मी” योजनेला येत्या 27 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हणाले की, 27 ऑगस्ट रोजी बेळगाव येथे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ होणार आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
राज्यातील 11 हजार ठिकाणी एकाच वेळी या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांमध्ये उद्घाटन सोहळा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पंचायतीने नोडल ऑफिसर नेमले असून हा कार्यक्रम निःपक्षपाती पद्धतीने आयोजित करण्यात यावा यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मंत्र्यांनी केले आहे.
यावेळी बोलताना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजनेची सुरुवात बेळगावातूनच व्हावी हे माझे स्वप्न आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. माझ्या विनंतीला मान देऊन आमचे नेते बेळगावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करीत आहेत ही एक ऐतिहासिक घटना असेल.
Belgaum Varta Belgaum Varta