बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे.
हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रथम श्रेणी युनिटच्या द्वितीय स्तरावरील इमारतीचे बुधवारी उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यापीठाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शिपाई ते कुलपतीपर्यंत तळमळ असावी. सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी विविध मार्गांनी वेगळ्या पद्धतीने कार्य केले पाहिजे.
विद्यापीठात नवीन प्रयोग व्हायला हवेत. अनेक तांत्रिक आणि वैज्ञानिक बदल अपेक्षित आहेत. त्यानुसार बदल करून विद्यापीठ नाविन्यपूर्णतेचे केंद्र बनले पाहिजे.
शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर ते विद्यापीठाच्या माध्यमातून शक्य आहे. ही जबाबदारी ओळखून विद्यापीठाचे कार्य घडायला हवे. तरुणांना ज्ञान आणि आत्मविश्वासाने सक्षम करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. प्राध्यापकांनी विद्यापीठांच्या वर्गखोल्यांमधून बाहेर पडून नवनव्या संशोधनांची कास धरावी. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शासन सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली.
सर्वसमावेशक, ठोस कर्नाटकासाठी शिक्षण हा पाया आहे. त्यामुळे सर्वांसाठी शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उच्च शिक्षण व कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे, असे मंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुझराई, हज आणि वक्फ विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य आणि तंत्रज्ञान शिक्षणाची गरज व्यक्त केली.
बेळगाव ग्रामीण आम.लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगावच्या विकासाला पूरक असलेल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. सांडपाणी समस्या सोडवण्यासाठी 300 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. हिरेबागेवाडी गावातील कचरा विल्हेवाट करण्यासाठी दहा एकर जमीन देण्याची विनंती आम. हेब्बाळकर यांनी केली.
यावेळी विद्यापीठाचे कुलपती प्रा. एम. रामचंद्र गौडा, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महांतेश कवटगीमठ यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …