हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय.
हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त विधान केले आहे. पक्ष संघटन तसेच आगामी राजकीय हालचालींसंदर्भात चर्चा करण्यात आली असून कार्यकारिणीच्या माध्यमातून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वरिष्ठांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून आगामी निवडणुकीत भाजप बहुमतात सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी विश्रांती घ्यावी, असे म्हणणार्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या विधानावर माझ्यावर कुमारस्वामींचे खूप प्रेम आहे असे सांगत त्यांच्या विधानाची खिल्ली उडविली. वर्षभर दररोज 15 तास काम करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगत मंत्री मंडळ विस्ताराबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालीच आगामी निवडणुका होतील, असे राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी सांगितले असून सर्वांनी एकत्रितपणे हि निवडणूक लढवून भाजपाची सत्ता आणायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बीडीए भ्रष्टाचारप्रकरणी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत प्रस्ताव मागितल्याचे सांगत परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले.
बी. एस. येडियुराप्पा यांच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुढे येत असून आगामी निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदल होणार नाही. शिवाय आगामी निवडणुका देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालीच पार पडणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आज हुबळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून भाजप प्रभारी अरुण सिंग आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta