धजदला धक्का : काँग्रेस प्रथम, भाजप दुसर्या स्थानावर
बंगळूर (वार्ता) : अलीकडेच झालेल्या कर्नाटकातील विधानपरिषदेच्या 25 जागांच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रत्येकी 11 जागा जिंकून समान शक्ती प्रदर्शन केले होते. परंतु राज्यातील 58 शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. एकूण 1187 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 498 जागा, तर भाजपने 437 जागावर विजय मिळविला आहे. धजदला 45, इतरांना 204 जागांवर विजय मिळाला आहे.
कर्नाटकातील 58 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी, विविध नागरी संस्थांच्या 9 प्रभागांसाठी आणि 57 ग्रामपंचायतींसाठी 27 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक झाली होती. कोविड-19 साथीच्या आजारामुळे निवडणुका तीन वर्षांपासून लांबल्या होत्या.
काँग्रेस पक्षाने राज्यातील सत्ताधारी भाजपला मागे टाकले आहे. कारण शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेसला 42.06 टक्के, भाजपला 36.90 टक्के, धजदला 3.8 टक्के आणि इतरांना 17.22 टक्के मते मिळाली.
शहर नगरपरिषदेच्या 166 प्रभागांपैकी काँग्रेसला 61, भाजपला 67, धजदला 12 आणि इतरांना 26 जागा मिळाल्या आहेत. 441 नगरपरिषद प्रभागांपैकी काँग्रेसला 201, भाजपला 176 आणि धजदला 21 जागा मिळाल्या आहेत. नगर पंचायतीतील 588 प्रभागांपैकी काँग्रेसला 236, भाजपने 194 आणि धजदला 12 तर इतरांनी 135 प्रभागात विजय मिळवला.
—————————————-
कांही स्थानिक संस्थांचे निकाल
* गदग-बेटगेरी नगरपरिषद – 35 पैकी 18 प्रभागात भाजप, काँग्रेस 15 आणि अपक्ष 2 विजयी.
* अन्निगेरी (धारवाड) नगरपंचायत – 23 पैकी काँग्रेस 12, भाजप आणि अपक्ष प्रत्येकी 5
* रन्ना बेलगढी (मुधोळ) नगरपंचायत – 18 प्रभागांपैकी काँग्रेस 8, भाजप 5, अपक्ष 5
* बंकापूर (शिगगाव) – काँग्रेस 14, भाजप 7, आणि अपक्ष 2
* अथणी (बेळगाव) – 21 जागांपैकी काँग्रेस 11, भाजप 9, इतर 3
* दावनगेरे – 23 पैकी ़कंग्रेस 12, भाजप 7, धजद 3, अपक्ष 1
* चिक्कमंगळूर – 35 पैकी काँग्रेस 12, भाजप 12, धजद 2, इतर 2
* कौप (उडपी) – 23 पैकी काँग्रेस 7, भाजप 12, धजद 1, इतर 3
* बंकापूर नगरपालिका – 23 पैकी काँग्रेस 14, भाजप 7, अपक्ष 2
* गुत्तल नगरपंचायत – 18 पैकी काँग्रेस 11, भाजप 6, अपक्ष 1
* मोलकाल्मूरू नगर पंचायत – 16 पैकी काँग्रेस 11, भाजप 2, अपक्ष 3
———————————
मुख्यमंत्री बोम्मई, जोल्ले, श्रीरामलूना धक्का
मुख्यमंत्री बसवराज बोमई, मंत्री श्रीरामुलू, शशिकला जोल्ले, हलप्पा आचार, आनंद सिंह आदीना त्यांच्या मतदारसंघातील पालिका निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बोम्मई यांची या निवडणुकीत कसोटी लागली होती. बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील बंकापूर नगरपरिषदेत भाजपला झटका बसला. या ठिकाणी 23 पैकी काँग्रेसने 14 जागावर विजय मिळविला, तर भाजपला केवळ 7 जागा मिळाल्या. त्याचप्रमाणे गुत्तल नगरपंचायतीतही 18 पैकी काँग्रेसने 11 व भाजपने केवळ 6 जागा जिंकल्या.
चिक्कोडी तालुक्यातील एक्संबा येथील निवडणुकीत मंत्री शशीकला जोल्ले व भाजपचे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांची कसोटी लागली होती. परंतु तेथे काँग्रेसने स्पष्ट बहूमत मिळविले. अथणी नगर परिषदेतही माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व आमदार महेश कुमठळ्ळी यांचा मुखभंग झाला आहे.