मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटवणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलताना लॉकडाऊनबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं होतं. कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.
मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊनसंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसेच राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.