बेंगळूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बऱ्याच वेळेला रुग्णांना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, बुधवारी कर्नाटक काँग्रेसच्या वतीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे.
कर्नाटक युवा कॉंग्रेस कमिटीच्या पुढाकाराने काँग्रेसने कोडगू, शिमोगा आणि चिकमंगळूर येथील नागरिकांसाठी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत केपीसीसी कार्यालय, क्वीन्स रोड येथे नवीन रुग्णवाहिका सेवा सुरू केली. भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते या नव्या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांना रुग्णवाहिकेची कमतरता भासू नये आणि गरजूंना विनामूल्य सेवा मिळावी यासाठी काँग्रेसच्या वतीने रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. बऱ्याच वेळेला रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वेळेत रुग्णांना उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोफत रुग्णवाहिका सेवेची मदत होणार आहे.