मुंबई -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-20 सामन्यांची मालिका बीसीसीआयने अखेर रद्द केल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर ही मालिका होणार होती. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यासाठी विंडो मिळावी, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
बायोबबलचे संरक्षण असूनही अनेक खेळाडू आणि कर्मचारी वर्गाला आयपीएलदरम्यान करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामने स्थगित करण्यात आले होते.
हे उर्वरित सामने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अमिरातीत खेळवले जाणार असून, 10 दिवस डबलहेडरचे सामने खेळवले जातील.
टी-20 सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएल हाच सर्वोत्तम पर्याय आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले गेल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी होणार असल्याने खेळाडूंना या कालावधीत सरावासाठी वेळ मिळणार आहे.
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका त्यानंतरच्या काळात वेळापत्रकाचा आढावा घेऊन खेळवता येणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.