बेळगाव : बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जल मार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयातून त्यांना या निवडीचे पत्र पाठवण्यात आले आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपली या पदी निवड करण्यात आली असून आपण वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आपल्या निवडीबद्दल बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने खासदार सुरेश अंगडी यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची धुरा दिली होती. त्यांच्या निधनानंतर बेळगावच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला अंगडी यांची, बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करून केंद्राने बेळगाव जिल्ह्याचा गौरव केला असल्याचे खासदार मंगला अंगडी यांच्या समर्थकांतून सांगण्यात येत आहे.