माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर : वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या समस्या
निपाणी : सबसिडी देऊनच वीज बिले माफ करावीत शिवाय टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या असणार्या समस्या व अडचणी राज्य सरकारने वेळीच सोडाव्यात अशी मागणी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शंकराप्पा पाटील मुनीकोप यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली.
बेळगाव येथील विधानसौध येथे झालेल्या बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. कारखानदारांच्यावतीने बोलताना वड्डर म्हणाले, सद्यस्थितीत बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात बोरगाव येथे मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल पार्कची उभारणी केली आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारांनी गुंतवणूक करून उद्योग उभारले आहेत. असे असताना सध्या कारखानदारांना देण्यात येणार्या वीज बिलापोटी मिळणारी सबसिडी बिला समवेतच मिळावी, महाराष्ट्रात या नियमानुसारच वीज बिलाचे वाटप होते. मात्र कर्नाटक राज्यामध्ये 20 एचपीपर्यंत विजेचा वापर होणार्या उद्योजकानाच सबसिडी मिळवून दिली जाते. व त्यानंतर वाढीव विजेचा वापर होणार्या उद्योजकांना मात्र वीज बिल भरल्यानंतर तीन महिन्यानी सबसिडी मिळते, हे धोरण चुकीचे आहे.
ए.सी, एस.टी कारखानदार, उद्योजकांसाठी कर्ज घ्यावयाचे असल्यास सिक्युरिटी मागवली जाते. त्यामुळे राज्य सरकारने टेक्स्टाईल तसेच यंत्रमाग कारखानदारांच्यासाठी लागू केलेले अनेक नियम व अटी जाचक आहेत. त्यामुळे कारखानदारांची मोठी अडचण झाली आहे.
राज्यात बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यात येणार्या बोरगाव टेक्स्टाईल पार्कमधून सर्वाधिक उत्पादन होते. यातून शासनाला जादाचा महसूल मिळतो, असे असताना राज्य सरकारने मात्र अशा कारखानदारांसाठी काही नियम व अटी या जाचक स्वरूपात लावल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांना ते अडचणीचे ठरत आहे. बर्याच वेळेला सुरळीत वीजपुरवठाअभावी उद्योग व्यवसायाला खीळ बसत आहे.
राज्य सरकारकडून मिळणार्या सोयी व सवलती याची माहितीही कारखानदारांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे अशा कारखानदारांच्या असणार्या प्रमुख मागण्या व समस्या राज्य सरकारने वेळीच सोडवणे गरजेचे आहे. विशेष करून बोरगाव टेक्स्टाईल पार्कमध्ये रस्ते, गटारी तसेच लाईटची सोय नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने या बाबीचा जरूर विचार करणे गरजेचे आहे.
यापूर्वी या विभागातील कारखानदारांच्यावतीने राज्य सरकारला तसेच जिल्हा प्रशासनाला याबाबी नजरेस आणून दिलेल्या आहेत. मात्र याकडे अद्यापही दुर्लक्ष झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी वस्त्रोद्योगमंत्री शंकराप्पा पाटील, मुनीकोप यांनी कारखानदारांच्या अडचणी व समस्या ऐकून घेऊन त्याचे निवारण वेळीच केले जाईल असे सांगितले.
यावेळी वस्त्रोद्योग निगमचे सिद्धू सवदी, रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादवाड, यांच्यासह बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील वस्त्रोद्योग तसेच टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदार उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …