बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविणार्या आणि सध्या अटकेत असलेल्या 38 मराठी भाषिक युवकांवर अन्य गुन्ह्यांत बरोबरच आता भा.द.वि. कलम 124 अ अन्वये राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंगलोर येथील शिवरायांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ ध. संभाजी चौकात लोकशाही मार्गाने आंदोलन केलेल्या मराठी भाषिक युवकांवर दगडफेकीचा आरोप करत नाहक गुन्ह्यांमध्ये गोवण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत 38 मराठी युवकांना विविध गुन्ह्याखाली कारागृहात टाकले असून अन्य 23 जण भूमिगत आहेत.
या सर्व 61 जणांपैकी कारागृहात असलेल्या 38 युवकांवर आता खडेबाजार पोलीस स्थानकात भा.द.वी. 124 अ कलमान्वये राज्यद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 38 जणांना आज बॉडी वॉरंटसाठी खडेबाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून पुन्हा त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. संबंधित सर्व युवकांवर शहरातील खडेबाजार पोलिस स्थानकात 7 गुन्हे, कॅम्प पोलीस स्थानकात 1 गुन्हा आणि मार्केट पोलीस स्थानकात 1 गुन्हा या पद्धतीने विविध गुन्हे नोंदविण्यात आल्याचे कळते.
दरम्यान, बॉडी वॉरंट देऊन आज न्यायालयात हजर करण्यात आलेल्या 38 युवकांवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये आता भा.द.वि. 124 अ कलम जोडण्यात आल्यामुळे त्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे. त्यामुळे अटक झालेल्या युवकांच्या त्या गुन्ह्यातील जामीनासाठी लगेच अर्ज दाखल करता येणार नाही.
राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे जामीन मिळण्याची प्रक्रिया लांबली आहे. या गुन्ह्यासाठी थेट जामीन मिळत नाही त्यासाठी याचिका दाखल करावी लागते. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी किमान 10-12 दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती अॅड. महेश बिर्जे यांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकांच्यावतीने इतर गुन्ह्यांसाठी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून शुक्रवार दि. 30 डिसेंबर रोजी त्या अर्जावर सुनावणी होणार आहे. या खटल्यात युवकांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. श्रीधर मुतगेकर आणि अॅड. आर. एन. नलवडे हे काम पाहत आहेत.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …