बेळगाव : बेळगाव शहरासह परिसरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून फळा-फुलांसह सजावटीच्या साहित्यानी बाजारपेठ फुलून गेली आहे. बेळगाव शहरासह उपनगरातील बहुतेक गणेशोत्सव मंडळानी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा जल्लोषात साजरा केला आहे. ढोल-ताश्यांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव घरगुती असो किंवा सार्वजनिक गणपतीसमोर पाच फळे पुजण्याची प्रथा आहे. गणरायाचे आगमन काही तासांवर आल्यामुळे बाजारपेठेत फळ आणि फुले खरेदीसाठी तोबा गर्दी झाल्याची पाहायला मिळत आहे. पाच फळांची एकत्रित विक्री केली जात असून 100 रुपये पासून ते 250 रुपयांपर्यंत फळांचे दर वाढले आहेत. शहरातील मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार रविवार पेठ, तसेच शहापूर, वडगाव परिसरात ठिकठिकाणी फळे, फुले, फटाके त्याचबरोबर कापूर, अगरबत्तीची दुकाने थाटण्यात आली आहेत. गणेशोत्सव काळात या सर्व वस्तुंना वाढती मागणी आहे. आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गृहिणी सज्ज झाल्या असून तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.