सत्तेच्या पायघड्या घालने बंद करा
मुंबई : महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान दिले. पुरोगामित्वावर आधारित एक प्रशस्त मार्ग दाखवला. व्यवस्था परिवर्तनासाठी असंख्य महापुरूषांनी काम केले. केवळ या महामानवांच्या कुटुंबात जन्म घेतला म्हणून कुणी महापुरूष होवून त्याला दैवत्व दिले जावू शकत नाही, असा टोला बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांनी लगावत राज्यातील विद्यमान राजकीय घडामोंडीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
सामाजिक बदलांसाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले,त्याच महापुरूषांच्या कुटुंबात जन्माला आलेले व्यवस्था परिवर्तनाचे कार्य न करता व्यवस्थेच्या पायघड्या घालत असतील तर त्यांना महामानवांच्या विचारांचे वारसदार म्हणावे का? असा सवाल देखील ऍड. ताजने यांनी उपस्थित केला.केवळ राजकारणासाठी आपली वैचारिकता, स्वाभिमान गहाण ठेवणे योग्य नाही, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. त्यागमुर्तींच्या विचारांचे वारसदार होण्यासाठी त्यांच्यासारखे वागणे, विचार करणे आणि त्यांच्या विचारांचा अंमल करणे महत्वाचे आहे.
परंतु, सध्याच्या काही वारसदारांच्या वर्तनातून त्यांनी सदैव महामानवांच्या आचरणाला बगल दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशात समाजाला दिशा दाखवण्याची क्षमता असलेल्या या नेत्यांनी आपल्या आचरणाबद्दल आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.बहन सुश्री बहन मायावती जी यांचा महापुरूषांच्या कुटुंबाशी काही एक संबंध नाही. पंरतु, आयुष्यभर त्यांनी महापुरूषांच्या विचारांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी आपले आयुष्य झिझवले. त्यांच्या आरचरणातून बोध घ्यावा, असे आवाहन ऍड. ताजने यांनी केले आहे.
कोल्हापूरचे नाव ‘शाहूमहाराजनगर‘ करा
१९१९ मध्ये छत्रपती शाहु महाराजांना उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये आयोजित एका समारंभातून ‘राजर्षी’ ही उपाधी देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात सत्तेवर येताच मा. बहन मायावती जी यांनी कानपूर जिल्ह्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले. त्यांच्या नावाने विद्यापीठे, स्मारके उभारली. रमामाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे जिल्ह्यांना दिली. स्मारके उभारली. हजारो कोटी रूपये खर्च केले. मग महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी कोल्हापूरचे नाव बदलून ‘शाहूमहाराजनगर’ करून दाखवावे. रायगडचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’, बुलढाणाचे नाव ‘जिजामाता नगर’, पुण्याचे नाव ‘महात्मा फुले नगर’ करून दाखवावे. केवळ दाखवण्यासाठी महापुरूषांच्या नावाचा वापर करू नये. बहुजनांचे नेते म्हणण्याचे धारिष्ट राज्यातील राजकीय पक्षांनी करूच नये. अशात महामानवांच्या वारसदारांनी खऱ्या अर्थाने महापुरूषांच्या विचारावर चालणाऱ्या बसपात येवून पक्षाचे हात बळकट करावे, असे आवाहन ऍड. ताजने यांनी केले आहे.