Saturday , September 21 2024
Breaking News

युवकाच्या खुनानंतर गौंडवाड गावात दगडफेक व जाळपोळ

Spread the love

बेळगाव : गौंडवाड ता. बेळगाव येथील एका युवकाच्या खुनानंतर संतप्त जमावाने शनिवारी रात्री दगडफेक, जाळपोळ केल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गाव दहशतीच्या सावटाखाली आहे. जमावाने सुमारे 8 हून अधिक वाहने पेटविली असून गवत गंजींनाही आगी लावण्याचा प्रकार घडला आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सतीश राजेंद्र पाटील (वय 40) रा. भैरवनाथ गल्ली, गौंडवाड असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. तो मेडिकल रिपेझेंटेटीव्ह होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सतीशच्या खुनानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनाही बेदम मारहाण केली आहे. वडील, चुलते आदिंवर लाठीहल्ला करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी आदिंसह शहरातील बहुतेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली.
संपूर्ण गावात दहशतीचे व भीतीचे वातावरण पसरले असून खून व जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरातील गावे व महामार्गावरील धाबे, दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. मध्यरात्रीनंतरही वरिष्ठ अधिकारी गौंडवाड येथे तळ ठोकून होते. दगडफेक, जाळपोळीच्या घटनेनंतर गावातील तरुणांनी धरपकडीच्या भीतीने गाव सोडले आहे. अग्निपथ योजनेला सर्वत्र विरोध होत आहे. पोलीस दल या बंदोबस्तात गुंतले असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भैरवरनाथ मांदिरासमोर एक इन्होव्हा कार उभी करण्यात आली होती. गावकरी रविवारच्या पूजेसाठी मंदिराची साफसफाई करणार होते. त्यामुळे सतीश पाटील व इतर पंचांनी मंदिरासमोर उभी करण्यात आलेली इन्होव्हा बाजूला घेण्यास सांगितले. हेच कारण होऊन कोयता, जांभियाने सतीशवर हल्ला करण्यात आला.
अचानक झालेल्या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले. इस्पितळात पोहोचण्या आधीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सतीशचा मृत्यू झाल्याचे समजताच गावातील जमाव संतप्त झाला. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर एक गुड्स वाहन उलटवून ते पेटविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे उभी करण्यात आलेली एक इन्होव्हा, एक टाटा सुमो तेथून जवळच एका घरासमोर उभा करण्यात आलेला पाण्याचा टँकर पेटविण्यात आला. याच परिसरात आणखी एक वाहन उलटवून त्याला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर गल्ली परिसरात एक तर ट्रॅक्टर पेटविण्यात आला. नागरी वस्तीतील तीन गवत गंजीना आगी लावण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी काकती पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गावात पूर्णपणे दहशतीचे वातावरण आहे. असे कळविल्यानंतरही पोलीस उशिरा दाखल झाले. त्यामुळे जमावाने धुडगूस घातली. सुरुवातीला पोलीस बळ कमी होते. त्यांच्यावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला.

देवस्थानची जमीन व इतर कारणांसाठी गेल्या काही वर्षांपासून गौंडवाड येथे दोन गटात संघर्ष निर्माण झाला होता. यापूर्वीही हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काकती पोलीस स्थानकात फिर्याद प्रती फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही म्हणून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सतीशच्या कुटुंबियांना पोलिसांची मारहाण

रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या घटनास्थळी दाखल झाले. त्याआधी खून झालेल्या सतीशच्या घरात घुसून पोलिसांनी त्याचे वडील, चुलते व इतर कुटुंबियांना बेदम मारहाण केली आहे. महिलांनाही मारहाण झाली आहे.
पोलीस निरीक्षकाचा निष्काळजीपणा
काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. ते सामान्य नागरिकांचे फोन घेत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. शनिवारी या घटनेची माहिती देण्यासाठी काही जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी आपण इतर कामात व्यस्त आहोत, असे सांगत त्यांनी फोन ठेवला. वेळेत पोलीस दाखल झाले असते तर मोठ्या प्रमाणात झालेली जाळपोळ टाळता आली असती.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

Spread the love  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *