Friday , October 18 2024
Breaking News

अन्यायाविरोधात लढल्यास परिवर्तन शक्य : संजय आवटे

Spread the love

 

निपाणीत शाहू, फुले, आंबेडकर विचार संमेलन

निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक अन्याय विरोधात लढल्यास क्रांती आणि परिवर्तन होऊ शकते. शाहू, फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने जपला पाहिजे. त्यांनीच समाजाला योग्य दिशा दिली आहे. सर्वांनी बदलणारे जग समजून घेतले पाहिजे. सध्याच्या व्यवस्थेला विचारांची भीती वाटत असल्याने अनेक विचारवंतांचे मुडदे पाडले जात आहेत. जातीय व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने जगणे शिकले पाहिजे. महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे रविवारी (ता.२४) राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात २७ वे शाहू, फुले आंबेडकर विचार संमेलन झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आवटे बोलत होते.
विद्रोही कवी आणि विचारवंत अनंत राऊत म्हणाले, प्रत्येक जाती धर्मामध्ये घेण्यासारखे बरेच काही आहे. त्याचा आपल्या जीवनात वापर केला पाहिजे. प्रत्येकाने संविधान वाचून आयुष्य पुस्तकांच्या सानिध्यात घालवणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागे करण्याचे काम केले आहे. आजच्या युवकांनी त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे. आपल्या तत्वांना विचाराच्या आगीत उजळून काढण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करावा.
प्रत्येकाने माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. सध्याच्या राजकारणात जाती-धर्मांमध्ये आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय माणुसकीचा गळा दाबला जात असून प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येकाने देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. सध्या सर्वसामान्यांच्या मढ्यावर धर्म भाजला जात आहे. प्रत्येकाचा मित्र हा आरशासारखा असावा, असे सांगून ‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’ ही कविता राऊत यांनी सादर केली. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रारंभी प्रा. हरी नरके विचार पिठाचे अनावरण झाले‌. त्यानंतर क्रांतीज्योती महिला मंडळाच्या महिलांनी क्रांती गीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. अमित शिंदे यांनी स्वागत प्रा. सुरेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या ‘जिवनदृष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील प्रा. सुभाष जोशी, सहकाररत्न उत्तम पाटील, लक्ष्मण चिंगळे, प्रा. डॉ. अच्युत माने, श्रीकांत वराळे, अशोक असोदे, राजेश कदम, अविनाश कट्टी, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, राजेंद्र वड्डर, दिलीप पठाडे, प्रा. नानासाहेब जामदार, मल्ले चौगुले, गणी पाटेल, प्रा. डॉ.एन. डी. जत्राटकर, अशोक लाखे, सुधाकर माने, नगरसेविका अनिता पठाडे, शांती सावंत, दीपक सावंत यांच्यासह निपाणी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *