बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाचा 35 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ. चंद्रभागा सांबरेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका ज्योती मजुकर हजर होत्या. प्रारंभी श्रीमती अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रमुख पाहुण्या व पंचमंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अंजना शंभूचे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुनिता शंभूचे यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्राध्यापिका ज्योती मजुकर यांचे स्वागत सौ. सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर सौ. सांबरेकर यांच्या निवृत्ती निमित्त रेणुका कोकितकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्योती मजुकर यांनी याप्रसंगी भाषण करताना समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता आणि समाधान या पंचसूत्रीवर स्त्रीने आचरण केल्यास जीवनातील यशस्वी होऊ शकते असे सांगून घरात वावरताना साऱ्यांचा आदर करावा असे त्या म्हणाल्या. समाजासाठी हितावह काम करावे यासाठी सायेशा इंडिया संस्थेच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. वर्षभरातील स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांची यादी अदिती पवार यांनी वाचली व ज्योती मजुकर यांनी बक्षीसांचे वाटप केले. पंचमंडळीच्या वतीने श्री. मालोजी अष्टेकर यांनी जिजाऊ महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पंचमंडळ सहकार्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. श्री. शरद पाटील यांनी मंडळासाठी नामफलक व साऊंड सिस्टिम देण्याचे आश्वासन दिले. नीलम बडवानाचे यांनी “स्त्री महिमा” या विषयावर मनोगत व्यक्त केले. विना उंदरे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर स्वाती खंडागळे यांनी आभार मानले. पंच श्री. बाबुराव कुट्रे आणि कविता उंदरे यांनी अल्पोपहाराची सोय केली. याप्रसंगी गल्लीतील महिला नागरिक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.