मुंबई : यशश्री हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवारी) पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आरोपीला उरणमध्ये आणण्यात आले. पोलिसांनी दाऊद शेखची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीने यशश्रीची निर्घृणपणे हत्या का केली याचे कारण देखील सांगितले आहे. दाऊद शेखने यशश्रीची हत्या लग्नाला नकार दिला म्हणून केली असल्याची कबूली दिली आहे.
दाऊद शेख आणि यशश्री यांची अनेक वर्षापासून ओळख
दाऊद शेख आणि मयत यशश्री एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते. शालेय जीवनापासून त्यांची मैत्री असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दाऊद शेखने यशश्रीला लग्नासाठी मागणी घातली होती त्याचबरोबर लग्नासाठी मागे तगादा लावला होता. लग्न करून बेंगलोर येथे स्थायिक होण्यासाठी दाऊद यशश्रीच्या मागे लागला होता. मात्र यासाठी यशश्रीने नकार दिला. 25 जुलै रोजी तो यशश्रीला भेटण्यासाठी आला असता दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर दाऊदने तिची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.
दाऊदवर हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
दाऊद शेखवर हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊदविरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशश्रीची हत्या करणाऱ्या दाऊदला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले. कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.