

सांगली कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात
नेसरी (संजय धनके) : आजरा तालुक्यातील मलिग्रे गावचे प्रसाद उर्फ बाबू दिनकर बुगडे (वय 26) सध्या राहणार सांगली या तरुण डॉक्टरचा सांगली कोल्हापूर महामार्गावर तावडे हॉटेल नजिक आज शनिवार दि. 20 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान ट्रकच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रसाद बुगडे यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झाला, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून दहावीपर्यंत मलिग्रे येथे शिक्षण घेतले व पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी सांगली येथे गेले होते. यावर्षीच त्यांचे बीएचएमएस शिक्षण पूर्ण झाले नंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यांचे वडील कगिनवाडी गावचे पोलिस पाटील होते. त्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना तीन बहिणी विवाहित असून दोन नंबरची बहीण एमबीबीएस डॉक्टर असून त्या एमडी करण्यासाठी मिरज येथे राहत असल्याने आपला भाऊ डॉक्टर व्हावा यासाठी आपल्या जवळ ठेऊन त्यांना शिक्षण दिले होते.
आईच्या डोळ्यांच्या उपचारासाठी कनेरी मठ येथे आज जायचे होते यासाठी प्रसाद यांनी आईला कोल्हापुर येथे बोलावले होते व प्रसाद सांगलीहून कोल्हापूरकडे आपल्या मोटरसायकलने येत असता एका मालवाहू ट्रकने धडक दिली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
प्रसाद उर्फ बाबूचे स्वप्न अपूर्ण
प्रसाद उर्फ बाबू डॉक्टर होऊन आपल्या गावात येऊन दवाखाना सुरू करण्याचे स्वप्न होते. आई सोबत राहून आईसह जनतेची सेवा करण्याची त्याची इच्छा होती मात्र काळाने त्याच्यावर घाला घालत त्यांचे स्वप्न अपूर्ण ठेवले..



Belgaum Varta Belgaum Varta