आजरा : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून ख्रिश्चन समाजातील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी चार वाजता घडली. मयतामध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते.
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यास गेले होते. धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लाॅईड गेला असताना तोही बुडाला. बंधाऱ्याच्या काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरड करताच नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.
दरम्यान बंधाऱ्याच्या काठावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यामुळे परोली बंधाऱ्यावर एकच गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरा शंतनू पाटील, आश्रम सांबरेकर, निखिल पाचवडेकर, सिद्धेश नाईक, गौरव देशपांडे, असीफ आगा, हसन उर्फ साफा मकानदार यांनी तिघांचेही मृतदेह बंधाराच्या पाण्यातून बाहेर काढले. यावेळी कुतिन्हो कुटुंबियांनी केलेला आक्रोश एकच पिळवटून टाकणारा होता. उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.