बेळगाव : कोरोना काळात रुग्णांना इस्पितळात दाखल करणे आणि इस्पितळातून घरी नेणे सोपे व्हावे यासाठी बेळगाव टॅक्सी असोसिएशनने ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदुम यांच्याहस्ते ही रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.
सध्या कोरोना रुग्णांचे आणि कोरोनाबळींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे आणि कोरोनाबळींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाणे पुरेशा वाहनव्यवस्थेअभावी जिकिरीचे झाले आहे. त्याशिवाय अनेक ऍम्ब्युलन्स चालक-मालक मनाला येईल तसे जादा भाडे आकारत आहेत. त्यामुळे नागरिकांची लूटमार सुरु आहे. ही बाब ओळखून बेळगाव टॅक्सी असोसिएशनने ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. सोमवारी बेळगावातील आरटीओ कार्यालयाच्या प्रांगणात आरटीओ शिवानंद मगदूम यांच्या उपस्थितीत या ऍम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आरटीओ शिवानंद मगदूम म्हणाले, कोरोना संकट काळात ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करून बेळगाव टॅक्सी असोसिएशनने चांगले कार्य केले आहे. या संकटाच्या काळात ऍम्ब्युलन्स चालक अवाजवी भाडे आकारत असताना लोकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करून जनसेवेसाठी पुढे सरसावलेल्या बेळगाव टॅक्सी असोसिएशनचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे अवाजवी भाडे आकारणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांच्या ऍम्बुलन्सची नोंदणी रद्द करून कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बेळगाव टॅक्सी असोसिएशनचे लक्ष्मण नाईक म्हणाले, लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी ही ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. त्याचा लोकांनी सदुपयोग करून घ्यावा.
यावेळी बेळगाव टॅक्सी असोसिएशनचे शेखर बसुरतेकर, नजीर सुरकुटे, मंजुनाथ कदम, सुरेश अरळीकट्टी, महेश शहापूरकर, धर्मु पवार यांच्यासह आरटीओ अधिकारी, असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …