बेळगाव : शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीसाठी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून शेत रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय येत्या विधिमंडळ अधिवेशनात घेणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी महानगरपालिकेच्या कार्यालयात निवेदन स्वीकारतेवेळी सांगितले.
बेळगाव शिवारातील रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत / पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. असे शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांना सांगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव, निळकंठ चौगुले, सुनील खनुकर, कामराज शाहपूरकर, प्रवीण तेजम, यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.