
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या कार्यकाळाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने नव्या महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून याबाबतचा प्रस्ताव सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून महापालिकेच्या कौन्सिल विभागाने आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
14 मार्च रोजी विद्यमान महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे कायद्यानुसार कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनकारक असल्याने प्रशासनाकडून या संदर्भात हालचालींना गती प्राप्त झाली आहे. यावेळी महापौर पद सामान्य महिला प्रवर्गासाठी तर उपमहापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महापौर पदावर सामान्य गटातील महिलेची वर्णी लागणार हे निश्चित आहे.
मागील वर्षी दोन्ही पदे ही शहराच्या दक्षिण विभागाला मिळाली होती त्यामुळे यावेळी उत्तर विभागातील भाजप नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
महानगरपालिकेने 65 सदस्यांची मतदार यादी प्रस्तावासोबत प्रादेशिक आयुक्तांकडे सादर करण्यात आले असून या यादीमध्ये 58 लोकनियुक्त नगरसेवक, 7 पदसिद्ध सदस्यांचा समावेश असून पदसिद्ध सदस्यांमध्ये जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू शेठ, आमदार अभय पाटील, आमदार साबण्णा तळवार, खासदार जगदीश शेट्टर व खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा समावेश आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीदरम्यान मतदानास हे सर्व सदस्य पात्र असतील प्रादेशिक आयुक्त जानकी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पाडणार आहे. लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असून यंदाचा महापौर, उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta