Sunday , July 26 2026
Breaking News

शहापूर स्मशानभूमीतील विकास कामे अधांतरी; सुधारणेसाठी राखीव निधीची तरतूद

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे काम केव्हा सुरू होईल आणि केव्हा पूर्ण होईल? याची कोणीच खात्री देताना दिसत नाही. आठ वर्षे उलटले आले तरीही स्मार्ट सिटीतील कामे पूर्ण झालेली नाहीत.अशाच पद्धतीने शहरातील अनेक भागात विकास कामे खोळंबली आहेत. त्यातच शहापूर स्मशानभूमीतील विकास कामांसाठी बनविण्यात आलेला आराखडा कागदावरच राहिला आहे. स्मशानभूमी सुधारणांसाठी महापालिकेचा राखीव निधी उपलब्ध असतानाही स्मशानभूमीतून विकासाची कामे योग्य त्या पद्धतीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहापूर स्मशान भूमीतील दोन्ही निवाऱ्यावरील पत्रे अत्यंत धोकादायक स्थितीत होते. यामधील एका निवाऱ्याचे काम हाती घेण्यात आले.सदर काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक वेळ लागला आहे.महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून नव्याने निवारा, अंत्यदाहिनी शेगड्या आणि चौथर्‍याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी 31 लाख 70 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. यामधील निवारा आणि चार अंत्यविधी शेगड्यांचे काम पूर्ण झाले तरी मंजूर झालेल्या निधीतून बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सदर काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दीड महिन्यांची मुदत देण्यात आली होती मात्र निवारा आणि अंत्यविधी शेगड्या काम उरकण्यासाठी ठेकेदाराने तीन महिन्यांचा वेळ घेतला.

यातच नव्याने उभारण्यात आलेल्या शेजारील धोकादायक स्थितीतील निवार्यावर झाड कोसळल्याने संपूर्ण निवास कोसळला.महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी स्मशानभूमीला भेट देऊन कोसळलेला नवा निवारा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीचे प्रमाण वाढले आहे. सध्या दिवसाकाठी चार ते सहा अंत्यविधी होत आहेत.वडगाव स्मशानभूमीत लाकडांची कमतरता भासत असल्यामुळे वडगाव परिसरातील नागरिकांना शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी यावे लागते.

कोसळलेल्या जागी नवीन निवारा उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. महापौर मंगेश पवार यांनी यासाठी जातीने विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र निधी मंजूर झालेला असतानाही निवार्याचे अधांतरी राहिले आहे. नवा निवारा लवकरात लवकर उभारण्यात आला नाही तर पावसाळ्यात नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. निवाऱ्या अभावी जमिनीवर अंत्यविधी करण्यासाठी लाकडे मोठ्या प्रमाणावर लागतात.त्यामुळे नागरिकांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

आमदार अभय पाटील यांनी शहापूर स्मशान भूमीच्या सुधारणे संदर्भात आराखडा बनविला आहे.शहापूर स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.मात्र स्मशानभूमी सुधारण्याचा आराखडा कागदावरच राहिला आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सोयही दिसून येत नाही.यापूर्वी स्मशानभूमीच्या विकास कामांसंदर्भात कार्यरत असलेल्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने विविध संघ संस्थांच्या तसेच दानी व्यक्तींच्या सहकार्यातून विविध प्रकारची विकास कामे या ठिकाणी राबविण्यात आली. आजही अनेक संस्था स्मशानभूमीतील विकास कामांबाबत सहकार्य करण्यास तयार आहेत मात्र महापालिकेचा स्मशानभूमी विकास आराखडा अन्य सेवाभावी सामाजिक संस्थांच्या सहकार्यात अडचणीचा ठरला आहे.

सध्या स्मशानभूमीत नव्या पद्धतीचे दिवे बसवतानाही योग्य त्या प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. स्मशानभूमीच्या जागेत एकमेकांजवळ दिवे लावले जात असताना दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वार आणि मंदिराजवळ नवे दिवे लावण्याच्या मागणीला मनपाच्या अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला आहे.मनपाचे अधिकारी स्मशानभूमीतील विकास कामे संदर्भात मनमानीपणे काम करत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांनी आपला कार्य कालावधी पूर्ण होण्याअगोदर, स्मशानभूमीतील अन्य विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत आणि जनतेचा दुवा घ्यावा, यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *