Tuesday , March 3 2026
Breaking News

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण, ज्ञानज्योती पुरस्कार वितरण, ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार वितरण आणि मागील शैक्षणिक वर्षात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम मराठा मंदिर येथे संपन्न झाला.

​त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार श्री. हेमंत ढोमे उपस्थित होते. त्यांनी ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ या विषयावर आपले विचार मांडले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “मातृभाषेतून शिकले तर प्रगतीचे घोडे कुठेच अडत नाही. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली आहे आणि ते इंग्रजी भाषाही चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. सध्या महाराष्ट्रात मराठी शाळांना वाईट दिवस आले असून पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे; हीच परिस्थिती सीमाभागातही दिसत आहे. देशातील तुळू भाषा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही, त्यामुळे मराठी संपू नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्याकडून मराठी भाषेसाठी आणि शाळांसाठी जे काही करता येईल, त्यासाठी मी सदैव तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रदीर्घ काळापासून चाललेला सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू आणि आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​बेळगावातील युवा कलाकार शिवराज चव्हाण यांनी परिसंवादात हेमंत ढोमे यांची मुलाखत घेतली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर आणि युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. हेमंत ढोमे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
​बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सामान्यज्ञान परीक्षेत यश मिळवलेल्या लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगावसह खानापूर तालुक्यातील एकूण पाच शाळांना ‘श्रीनिवास केशवराव म्हणपसेकर’ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
​यावर्षी प्रथमच, प्रतिकूल परिस्थितीत मराठी शाळा टिकवणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानज्योती पुरस्काराची’ घोषणा करण्यात आली होती; हा पुरस्कार सरकारी मराठी शाळा, जामगाव (ता. खानापूर) या शाळेला देण्यात आला. तर मागील काही वर्षांपासून शैक्षणिक उपक्रमात सातत्य आणि परिपूर्णतेसाठी धडपडणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. त्यान्वये मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
​या कार्यक्रमाला म. ए. समितीचे व युवा समितीचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. स्वागत सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी, तर प्रास्ताविक चिटणीस प्रतीक पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

Spread the love  बेळगाव : आज शाळा नं 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *